दिशाभूल म्हणतात ती हीच, कळ्ळे मू भेंब्रोबाब?

श्री. उदय भेंब्रो, सरचिटणीस, कोकणी भाशा मंडळ, मडगाव ह्यांचे ११ एप्रिलच्या (महाराष्ट्र टाईम्स) अंकात आलेले पत्र वाचले. मी मराठी जनतेची दिशाभूल करत आहे याचे त्यांना दु:ख वाटते, ही त्या पत्रातली शेवटली ओळ वाचून मला मजा वाटली. मराठी लोकांची दिशाभूल करायचे किंवा भेंब्रोंना दु:ख द्यायचे मला काय कारण आहे?

बंगाली, मराठी, तामीळ, तेलुगू यांसारख्या इतर भारतीय भाषांइतकीच कोकणी हीही एक साहित्याने समृध्द असलेली भाषा आहे असा भास कोकणी लोकांच्या म्हणजे मुख्यत: गोव्यात कोकणी बोलणाऱ्यांच्या मनात निर्माण करण्याचा साहित्य  ऍकेडेमीचा निर्णय हा त्या जनतेची खरी दिशाभूल करणारा असा आहे. तज्ञ समितीचा निर्णय म्हणजे ब्रम्हवाक्य नव्हे आणि ऍकेडेमीने नेमलेल्या तज्ञांतल्या बाबूराम सक्सेना, मीनाक्षी सुंदरम वगैरे लोकांपेक्षा कोकणी ही साहित्याची भाषा आहे का नाही हे ऍकेडेमीतल्या प्रा. वसंत बापट, डॉ. रा. शं. वाळिंबे, डॉ. दांडेकर, डॉ. वेर्णेकर, रणजित देसाई, डॉ. मालशे ह्या लोकांना निश्चितच चांगले माहित आहे. मी स्वत: कारवारी कोकणी उत्तम बोलतो. सावंतवाडीची कोकणी, मालवणी कोकणी मला येते. मंगळूरकरांची कोकणी आणि अंकोलकरांची कोकणी यातला फ़रक मी ओळखू शकतो. आणि त्यात पुन्हा बामणांची कुठली आणि गावड्यांची कुठली हाही भेद मला ह्या बाबूराम सक्सेना किंवा मीनाक्षी सुंदरम यांच्यापेक्षा अधिक चांगला ठाऊक आहे. ’हांगा यो’ म्हणणारा आपल्या बोलीला कोकणीच म्हणतो आणि  ’हैसर ये किंवा ’हडे ये’ म्हणणाराही तिला कोकणीच म्हणतो. ह्यापैकी कोणीही आपआपली कोकणी ही साहित्य लिहिण्याची भाषा आहे आणि तिला साहित्याची उज्वल परंपरा आहे असे कधीही म्हटले नाही. मग साहित्य ऍकेडेमीने मान्य केलेली “कोकणी” म्हणजे कुठली कोकणी? आणि प्रश्न आहे, ही भाषा समृध्द साहित्य प्रसवलेली भाषा आहे का? तशा भारतात ज्या ज्या बोलल्या जातात त्या सगळ्याव भाषा. उद्या मी “चलातु चयका चळतेक?” असे वाक्य म्हटले तरी ते ’च’काराच्या भाषेतलेच असते. तेव्हा उगीचच तज्ञ समितीच्या निर्णयाचा बागुलबुवा उभा करायचे कारण नाही. सर्व मराठी सभासदांनी विरोध केला असताना, जी मराठीची बोली आहे तिच्या बाबतीतला हा असला निर्णय पंचवीस विरुध्द पंधरा मतांनी घेण्याचा नाही. आता श्री. भेंब्रोंनी जे निकष दिले आहेत त्यांची ह्या तज्ञांनी कशी तपासणी केली आहे ते पाहू या.

संबंधित भाषा ही भाषाशास्त्रीय दृष्ट्या स्वतंत्र भाषा आहे काय?

आता भेंब्रोंच्या माहितीसाठी ह्याचे उत्तर तज्ञ समितीतल्या डॉ. घाटगे ह्यांच्या ग्रंथातूनच घेतो म्हणजे दिशाभूल नको आणि दु:खही नको. ’अ सर्वे ऑफ़ मराठी डायलेक्ट्स’ ह्या ग्रंथमालेच्या पहिल्या खंडाच्या आरंभीच डॉ. घाटगे लिहितात, “कोकणी ह्या नावाचा अर्थ पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्र, गोवा, म्हैसूरचा काही प्रदेश धरुन केरळच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतच्या बोलल्या जाणाऱ्या अनेक मराठी बोली असा आहे.” (“अ नंबर ऑफ़ मराठी डायलेक्टस”)-म्हणजे कोकणी हि स्वतंत्र भाषा नाही हे असंदिग्ध भाषेत सांगितले आहे.

प्रश्न दुसरा: ह्या भाषेला साहित्यिक परंपरा आहे का?

आता साहित्यिक परंपरेच्या बाबतीत भाषाशास्त्रातले दुसरे एक पंडित आणि कोकणी ह्या बोलीसमूहावरील सर्वश्रेष्ठ तज्ञ डॉ. सुमंत कत्रे यांचे मत. कत्रे स्वत: मंगळूरकडील कोकणी बोलणारे आहेत. आपल्या फ़ॉर्मेशन ऑफ़ कोकणी ह्या ग्रंथात ते म्हणतात “कोकणीला प्रगल्भ साहित्याची (सीरियस लिटरेचर) भाषा किंवा दरबारी भाषा म्हणून कधीच स्थान नव्हते.”

वास्तविक हे सांगायला तज्ञ नकोत पण भेंब्रो तज्ञांचा हवाला द्यायला लागले आहेत म्हणून तज्ञांचे मत. साहित्यिक परंपरा तज्ञांनी आपल्या लहरीप्रमाणे आहे की नाही हे ठरवायचे नसते. तिथे हजारो ग्रंथ दाखवावे लागतात. इथे फ़ादर स्टिफ़न्सपासून सोहिरोबानाथ आंबिये आणि आधुनिक काळात कारे, लक्ष्मणराव सरदेसाई, डॉ. प्रियोळकर या गोमंतकीय कोकणी जाणणाऱ्यांपासून ते घरात मालवणी, कुडाळी, कारवारी कोकणी बोलणाऱ्या सर्व आधुनिक कोकणी लेखकांपर्यंत ग्रंथनिर्मिती झाली ती मराठीत! ते योग्यच होते कारण कोकणी लोकांना मराठी हीच साहित्याची भाषा हे कळत होते. आज सावंतवाडीतल्या घराघरांत वाडीचेच कोकणी कोकणी बोलतात मग “वैनतेय” मराठीत का निघत आला आहे? रत्नागिरी काय पुण्याशेजारी आहे? मग तिथला बलवंत कशाला मराठीत? तेव्हा कोकणीला साहित्यिक परंपरा नाही म्हणून हाही निकष कोकणीच्या विरोधात गेला.

तिसरा निकष: ही भाषा साहित्यिक आणि सांस्कृतिक माध्यम म्हणून वापरली जाते का?

आता जिथे गोयकारांची गोयाभायली वसणूक हे वामनराव वर्दे (वास्तविक ह्यांनी वरदो कसे केले नाही?) वालावलीकारांचे पुस्तक हा एकमेव अपवाद सोडला तर शिक्षणासाठी किंवा अभ्यासासाठी निर्माण झालेले असे एकही कोकणी पुस्तक नाही. तिथे साहित्यिक माध्यम म्हणून पुस्तक वापरणार कुठले? वामनराव मात्र पार्ल्यात राहून गोमंतकीय कोकणीतच लिहित व बोलत. ’न वदेन यावनी भाषा’ सारखी ’न वदेत मराठी भाषा’ अशी त्यांची प्रतिज्ञा होती. एखाद्या भाषेविषयी मन इतके कटू ठेवून वागणे हे काही ज्ञानी वृत्तीचे लक्षण नाही. पण गोवा स्वतंत्र होण्य़ापूर्वी तिथले जे जे हिंदू साहित्यिक होते ते मराठीतूनच लिहीत-अजूनही लिहितात. गोव्यातील धर्मांतरीत ख्रिश्चनांनी मात्र पोर्तुगीज अंमलात राज्यकर्त्यांच्या धर्माप्रमाणे पाश्चात्य संगीत, पाश्चात्य वेषभूषा, आचार यांचा स्वीकार केला. त्यातली श्रीमंत आणि स्वत:ला उच्च स्तरावरची मानणारी मंडळी आपला घरचा व बाहेरचा व्यवहार पोर्तुगीज किंवा इंग्रजीतून करायला लागली. कोकणी ही निरक्षर गावड्यांची भाषा, अशा रीतीनेच ते कोकणीकडे पाहत आले. महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती समाजाने मराठीचा त्याग केला नाही. हा प्रकार गोव्यात झाला. हिंदू व ख्रिश्चन ह्यांच्यात धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक मतभेद निर्माण करण्यासाठी पोर्तुगिजांनी हा डाव टाकला होता. त्यांनी मराठी हि हिंदूंची भाषा करुन टाकली. मराठी भाषाच काय, पण देवनागरी लिपीशी संबंध राहिला तर पुन्हा हे धर्मांतरित ख्रिस्ती लोक मराठी वाचून विचलीत होतील ह्या भीतीने त्यांनी कोकणी लिहिलेच तर ते रोमन लिपीतून लिहीण्याची प्रथा पाडली. हिंदूंची मराठी नव्हे, तर हिंदूंची कोकणी बोलीसुध्दा गोव्यातल्या ख्रिस्ती लोकांच्या कोकणीपेक्षा निराळी आहे, भेंब्रोंनी हे नाही म्हणावे!

आता जे कोकणीवादी लेखक “कोकणी भाशा” लिहितात आणि तिला प्रमाणित भाषा करण्याचे जे प्रयत्न चालले आहेत त्या कोकणीचे ताजे उदाहरण देतो: श्री. नारायण देसाई यांनी लेनिनचे एक चरित्र १९७४च्या एप्रिलमध्ये प्रसिध्द केले आहे. त्यातले हे कोकणी (?) पाहा: “खुद्द मार्क्सान आशिया खंडातल्या विशिष्ट एशियायी उत्पादनपध्दतींची सूक्ष्म अभ्यास करुन ताचे योग्य ते महत्वमापेन करण्याची गरज प्रतिपादन केली. हे मार्गदर्शन मानूनच ह्या देशातले मार्क्सवादी-लेनिनवादी मुक्तिलढ्याचे डावपेच आखित आसतात.” आता ही भाषा जर मराठीहून निराळी आणि स्वतंत्र म्हणायची असेल तर बहुतेक मराठी साहित्य कोकणीतूनच लिहिले आहे, असे का म्हणू नये? ’भाषा’ असे मराठीत लिहितात ना? मग त्या ’ष’ चा शेंडीफ़ोड्या ’श’ करुन ’भाशा’ केली की झाली साहित्यिक कोकणी, इतके ते सोपे नसते. खरे तर गोमंतकीय कोकणीत ’भास’ म्हणतात. “कोकणी भास मंडळ” म्हणायला हवे. मराठी शब्दांनाच चार कोकणी वळणाचे प्रत्यय लावून कोकणी ही एक स्वतंत्र भाषा असल्याचा ’भास’ निर्माण करणारे मंडळ या अर्थानेही ते नाव समर्पक ठरेल.

आणि कोकणी म्हणजे काय फ़क्त गोयकारांचीच कोकणी? मालवणी, कुडाळी, चित्पावनी, कारवारी, मंगळुरी ह्यासारख्या स्थलपरत्वे आणि जातीपरत्वे बदलणाऱ्या कोकणीचे काय? माणूस उठून गेला की मालवणी कोकणीत “उठून गेलो’ म्हणणार; मंगळूरी कोकणी “वच्चू गॅलॉ” म्हणणार आणि कारवारी कोकणी “चमकलॉ” म्हणणार. ह्यातल्या कुठल्या कोकणीला ऍकेडेमीने मान्यता दिली आहे म्हणायची? तेव्हा जिथे प्रमाणित मराठी, गुजराती, कानडी ह्यासारखी प्रमाणित कोकणी नाही, तिथे तिचा साहित्यिक किंवा शैक्षणिक माध्यम म्हणून उपयोग कोण करणार? त्याच निकषात एक सांस्कृतिक माध्यमाचा भाग आहे. भारतातील लोकनाट्य, लोकसंगीत ह्यांच्या भाषा ह्या त्या त्या भागातल्या बोलीभाषाच आहेत. कुडाळ मालवण भागातले दशावतार मालवणी कुडाळी कोकणीतूनच होतात. बाणकोटच्या लोकांची गोमूची गाणी बाणकोटी बोलीत, कोळ्यांची गाणी कोळी बोलीत, घाटावरच्या तमाशाची भाषा सातारी-कोल्हापुरी, वऱ्हाडात वऱ्हाडी बोलीत शेकडो गाणी आहेत. म्हणून ह्या साहित्य आणि राज्यव्यवहारच्या भाषा मानल्या जात नाहीत. कारण त्यांचा वापर छोट्या छोट्या टापूत असतो. भारतीय संगीताची प्रमाण भाषा हिंदी नसून व्रजबोली आहे. तेव्हा आपण सगळेच भारतीय लोक आपल्या लोकनाट्य-लोकसंगीताची भाषा म्हणून आपापल्या टापूतल्या बोलीचाच उपयोग करत आलो आहोत. हे काही फ़क्त कोकणीचेच वैशिष्ट्य नाही. तेव्हा सांस्कृतिक माध्यम म्हणून ती भाषा वापरली जाते की नाही? -ह्या प्रश्नाला काहीच अर्थ नाही. ज्यावेळी आपण प्रमाणित भाषा म्हणून तिची योग्यता तपासत असतो त्या वेळी त्या भाषेत मोठे वैचारिक साहित्य, उत्तम दर्जाची नाटके, कादंबऱ्या, काव्य, महाकाव्य ऐतिहासिक काळातली कागदपत्रे, तिचा राजदरबारात झालेला उपयोग अशा गोष्टी पाहायच्या असतात. आज कोकणात अशी कोकणी साहित्याने समृध्द असलेली ग्रंथालये आहेत का? खुद्द गोव्यात नाटके होतात ती मराठीत. सारांश, हाही निकष कोकणीला लागू पडत नाही.

चौथा निकष: ही भाषा एखाद्या सरकारच्या शासनाची भाषा अथवा विद्यापीठाचे माध्यम आहे का? याचेही उत्तर “नाही” असेच आहे. गोवा सरकारने आपल्या टापूत गोमंतकीय कोकणी बोलले जात असल्याने कोकणीला उत्तेजन देण्याचे मान्य केले आहे. पण शासनाची भाषा म्हणून त्या भाषेचा स्वीकार केला नाही. लोकभाषांतील गीतांना, नाट्यपध्दतींना उत्तेजन देणे सरकारचे कर्तव्यच आहे. सातारा-कोल्हापुरी बोलीतील संवाद असणाऱ्या लोकनाट्याला महारष्ट्र सरकार उत्तेजन देत असते. म्हणजे सातारा बोली ही महाराष्ट्र राज्य शासनाची भाषा होत नाही. “कोकणी”चा विद्यापीठात माध्यम म्हणून उपयोग होत नाही, हे श्री. भेंब्रोही मान्य करतील.

ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या व ह्या भाषेत निर्माण होणारे साहित्य याचाही विचार होणे आवश्यक आहे, हा शेवटचा निकष.

१९६१च्या शिरगणतीच्या अहवालात गोवा, महाराष्ट्र आणि म्हैसूर ह्या विभागात राहणाऱ्या कोकणी बोलणाऱ्यांची संख्या सुमारे साडेतेरा लाख देण्यात आली आहे. ह्यात सगळ्या कोकणी बोली आल्या. गोव्यात १५ फ़ेब्रुवारीला भरलेल्या कोकणी लेखक परिषदेच्या एका उत्साही कार्यकर्त्याने ही लोकसंख्या आता अडतीस लाख झाल्याचे सांगितले. (परिवार नियोजन विभागाचे कोकणाकडे भलतेच दुर्लक्ष झालेले दिसते.) घटकाभर अडतीस लाख हा आकडा मान्य केला तरी अवधी, माळवी, संताळी वगैरे बोलणाऱ्यांच्या आकड्याहून हा आकडा कमी आहे. मग त्यांना का मान्यता नाही? “खासी” ही भाषा तर विद्यापीठात शिकवली जाते. त्या भाषेत महाकाव्ये लिहीली गेली आहेत. तिला मान्यता नाकारणाऱ्यात आली. सुरती, सौराष्ट्री बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्या मात्र गुजरातीच्या बोली आणि तज्ञांनीच सांगितलेल्या एकाही निकषाला न उतरणाऱ्या कोकणीला मात्र मराठीपासून वेगळे काढण्याची घाई कशाला?

याचे कारण सांस्कृतिक किंवा साहित्यिक नाही. “कोकणी” ही स्वतंत्र भाषा असल्याचा साक्षात्कार गेल्या काही वर्षातला. ज्ञानेश्वर, तुकोबा-सोहिरोबांचे अभंग आणि ओव्या ह्यांच्या गायनानेच गोव्यातली पहाट फ़ुटत होती. पण आता मात्र पणजी रेडिओला ज्ञानदेवांची वाणी ही “भायेल्ल्यांची” म्हणजेच “बाहेरच्यांची” वाटू लागली आहे. कोकणी लोकांच्या मुखीची कोकणी कोणीही बंद करत नव्हते. अर्थात “गोयची कोकणी” हिच कोकणी म्हणणारे कोकणीवादी वगळले तर उरलेल्या कोकणी माणसाला मराठी हि परक्यांची भाषा वाटत नाही. पोर्तुगिजांनी लादलेल्या संस्कृतिला आपली म्हणणारे गोव्यातील काही लोक वगळले-ह्यात हिंदू आणि ख्रिस्ती दोन्ही आहेत-तर शेकडो वर्षांच्या परंपरेने चालत आलेले मराठीचे नाते तोडायची गोमंतकीयांना मुळीच इच्छा नाही. त्या त्या टापूतली बोली आणि प्रमाणित भारतीय भाषा अतिशय सुखाने नांदू शकतात. ज्या महारष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार बहुमतात आहे त्यांनीही सर्वांना मराठीतूनच लिहीले आणि बोलले पाहिजे अशी सक्ती केली नाही. उलट कोकणी शाळा काढल्या. त्यांत दीड टक्काही मुलं गेली नाहीत हे खुद्द बा.भ.बोरकरांनी “केसरी”तल्या आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. पूर्वी पोर्तुगिजांनीही कोकणीतून लिहायला बंदी केली नव्हती. तरीही लोकात राष्ट्राभिमान जागृत करणारी वृत्तपत्रे मराठीतूनच निघत होती. त्या काळात कोकणीतून कथासंग्रह, कादंबऱ्या का लिहिल्या गेल्या नाही? त्या वेळी कोकणीचे प्रेम कुठे गेले होते? त्याचे कारण “कोकणी” हि भाषिक दुराभिमान जागवून सत्तेच्या जागापर्यंत पोहोचण्याची त्या वेळी राजकीय शिडी झाली नव्हती. कोकणीच्या प्रेमात मराठीचा दुस्वास आणून ही “भायेल्ल्याची” भाषा म्हणणारे लोक आज जे ऍकेडेम्यांना हाताशी धरुन मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, ते भाषेच्या विकासासाठी नव्हे.

कोकणीवरच कशाला? कुठल्याही भाषेवर मला राग नाही. उद्या कोकणीतून एखादी कविता मला ऐकायला मिळाली तर ती कोकणी आहे म्हणून मी कानावर हात ठेवणार नाही. असला दुराभिमान साहित्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाच नसतो. इचलकरंजीच्या मराठी साहित्य संमेलनात बोरकरांची “मंद मंद वाजत आयली तुजी गो पांयजणा” ही गोड कविता हजारो श्रोत्यांनी आनंदाने ऐकली. कारण मराठी माणसे कोकणी हि भायल्ल्यांची भाषा मानत नाहीत. मराठीच्या ह्या बोली म्हणजे आमच्या भाषेची अतिशय मुग्ध आणि सुंदर रुपडी आहेत. त्यांचे सर्व मराठी लोकांना अतोनात कौतुक आहे. ह्या कागदी व्यवहारापेक्षा माणसामाणसांमधल्या समोरासमोरच्या व्यवहारातल्या बोली-भाषा असल्यामुळे त्यांच्यात एक उपजत साधेपणा आहे. त्यातल्या म्हणी, गीते हे साज आम्ही आनंदाने आमचे म्हणून मिरवतो. पण त्यांचे मराठीशी असलेले नाते जर कुणी तोडायला निघाला तर मात्र त्याचा हेतू ते साज अधिक सुंदर करण्याचा नसून, आपला सुभा उभा करण्याचा अहे हे न कळण्याइतके कोणी दुधखुळे नाहीत. गोमंतकीय कोकणीच काय, पण अहिराणी, कोकणीतल्या इतर विविध बोली, वऱ्हाडी, त्यात जर सुंदर साहित्य निर्माण होत असेल तर मराठी माणसे त्याचे स्वागतच करतील. त्याउलट “कोकणी”सारखी बोली ही साहित्याने मराठी, गुजराती, बंगाली यांसारखी समृध्द साहित्यिक भाषा असल्याचे सांगून जर कोणी आमच्या कोकणी बांधवांची दिशाभूल करत असेल तर त्याविरुध्द आवाज उठविणे हे माझ्याप्रमाणे सर्व मराठी लोक आपले कर्तव्य मानतील याची मला खात्री आहे. खुद्द गोव्यातील नव्याण्णव टक्के जनतेने आपली मुले कोकणी शाळेत पाठवायचे नाकारुन त्या बोलीला प्रमाणित भाषा करण्याच्या प्रयत्नांची वाट लावून टाकली आहे. उरलेल्या कोकणात हा प्रश्नच कोणी निर्माण केला नाही. साहित्य ऍकेडेमीने भेंब्रो म्हणतात त्याप्रमाणे सगळे काही खूप नियमात बसवले असेल, पण खुद्द गोंयकार ते आपल्या जीवनात बसवायला तयार नाहीत त्याचे काय?

भेंब्रोंसारख्याच्या किंवा मराठी माणसांना त्यांच्या गोव्यात उपरे आणि “भायेल्ले” म्हणणाऱ्या लोकांच्या विषारी प्रचारामुळे मराठीबद्दलचा द्वेष निर्माण करण्यात त्यांना यशही लाभेल. द्वेषाच्या झेंड्याखाली माणसे पटकन जमतात. त्या सत्कार्यात अजून पोर्तुगिजधार्जिणे असलेल्यांचे, मूठभर श्रीमंतांचे आणि तात्कालिक राजकीय स्वार्थामागे लागलेल्या लोकांचे साहाय्यही लाभेल पण ज्या स्वतंत्र गोमंतक राज्याचे असल्या मंडळींना स्वप्न पडते आहे ते राज्य उद्या राजकीय कारवायांना यश मिळून झालेच तर त्या राज्याची भाषा मात्र कोकणी न करता इंग्रजी नाहीतर पोर्तुगीज करावी लागेल. कारण कोकणी शिकणार नाही, मराठी भायेल्ल्यांची, हिंदीचा अभ्यास करण्याची इच्छा नाही, अशा वेळी इंग्रजी ही भितुल्ल्यांची भाषा होते आणि ज्या मराठीच्या स्तन्यावर गोमंतकीय संस्कृती पोसली गेली ती भायेल्ल्यांची भाषा होते. दिशाभूल म्हणतात ती हीच, कळ्ळे मू भेंब्रोबाब?

-पु. ल. देशपांडे (महाराष्ट्र टाईम्स, १६ एप्रिल १९७५)

P.L. Deshpande-6The above article was an open letter from Shri. Purushottam Laxman Deshpande to Shri. Uday Bhembro, published on 16th April 1975 in Maharashtra Times in response to Shri. Bhembro’s letter accusing Deshpande of “misleading” marathi people on the Kokani Marathi issue. This letter was reprinted in Deshpande’s collection of letters titled “Ek Shunya Me”. Deshpande was an expert in Linguistics, apart from being the most read and celebrated Marathi writer.

PS: This was published in 1975 and hence some of the references he has made stand outdated. Also, I might not agree or subscribe to all the views expressed by Deshpande in this letter, partially or entirely.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *